कागदाची फुले

“शुभमंगल सावधान” अचानक ताशे वाजंत्रीच्या आवाजात एकदम गलका झाला. काय झालं म्हणून वीणानं स्टेजवर नजर टाकली. नवरी मुलीला तिच्या मामांनी एकदम वर उचलून घेतलं होतं. आता नवऱ्यामुलाची पंचाईत! मग त्याच्या शेजारी असलेल्या दोघातिघांनी त्याला देखील उचलला. वीणा थोडी नाराजच झाली होती. मुहूर्तासाठी एवढा खटाटोप करायचा आणि असा तो चुकवायचा. जाऊदे. मुलीच्या वडिलांची घालमेल त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आपल्या मर्मबंधातली ठेव कुणा अपरिचित असलेल्याच्या हातात सोपवायची म्हणजे किती कठीण. पण प्रत्येक मुलीच्या बापाला या दिव्यातून जावंच लागतं ना. आपल्याकडे ‘कन्यादान’ असा शब्द वापरतात. याबद्दल कोणाचे दुमत ही असू शकते, पण वीणाला त्यात सुंदर धार्मिक तत्त्व सामावलेलं आहे असं वाटतं, ‘दाता हो’ यातच सर्व सुखं सामावलेली आहेत. आपला जन्म देखील दानातूनच झालेला असतो ना? पण भौतिक जगात प्रत्येक जण देताना हात आखडता घेतो. जे जे उत्तम ते ते सर्व आपल्यासाठीच निर्माण केलेलं आहे ही भावना असते.  वीणानं आपल्या या अवेळी आलेल्या विचारांना झटकून टाकण्याचा प्रयत्न केला होता. मुलाच्या लग्नाआधी वर्षभर चाललेल्या तिच्या धावपळीला एकदाचं यश आलं होतं. पण त्या एका वर्षात एका वेगळ्याच जगाचा अनुभव तिला आला होता.

विनीतच्या लग्नाचं बघायचं असं ठरलं तेव्हा तिला वाटलं होतं, मुलगा राजबिंडा, एम डी डॉक्टर, प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस, गिरगाव सारख्या वस्तीत उत्तुंग टॉवर मधील चार खोल्यांचा फ्लॅट, एकुलता-एक, किती वेळ लागणार? झट-मंगनी-पट-ब्याह! पण मधल्या पंचवीस तीस वर्षात काळानं कात टाकली होती. उच्चशिक्षित, एकुलती एक मुलगी, स्वकर्ती, आई-वडील सर्वेसर्वा, गलेलठ्ठ पगार, शिक्षणाचा अभिमान असण्यापेक्षा अहंकाराचा पगडा जास्त.  स्वतंत्र मुलाचाच  फ्लॅट असावा, आई-वडिलांचा नको. प्रॉपर मुंबईत हवा पण ठाण्यापर्यंतच. जेवण करता येत नाही. हॉटेलिंग आवडतं. देव पूजा, घरचे रितीरिवाज म्हणजे गणपती, दसरा असे पारंपारिक सण वगैरे नाही जमणार. हो! उगाच का शिकवली तिला? बुवा, बापू, महाराज असं काही नाही चालणार हो आमच्या बाळीला! इति मातोश्री. मुलीला कोणी बोललेलं तिला चालत नाही. इथं तिचंच राज्य असतं. तिचे शब्द हातावर झेलतो आम्ही! आणि हो, मुलीला साडी नेसता येत नाही. नंतर उगाच वाद विवाद नको. एक ना अनेक मुक्ताफळं ऐकून वीणाच्या डोक्याचा भुगा होण्याची वेळ आली होती! म्हणता म्हणता वर्ष उलटून गेलं. काही ठिकाणी याच्या उलट अनुभव आले होते. आई-वडील मुलीच्या लठ्ठ पगारावर आरामात चैनीत राहात होते. तिच्या तारुण्याचा, भावनेचा, भविष्याचा विचारच नाही. दाखवायला म्हणून मुलं शोधण्याचं नाटक. परस्पर नकार, वर तिच्या योग्यतेचा मिळत नाही अशी मखलाशी! अशीच एक मुलगी विनीतला आवडली, तिलाही विनीत आवडला होता. फोनवर वीणाशी ती आपुलकीने बोलली होती, आणि अचानक तिच्या आईचा फोन! मुलीला सगळं पसंत होतं पण नवरा डॉक्टर नको. सहा महिन्यांनी त्या मुलीचा फोन! काकू तुम्ही मला नकाराचं कारण सांगाल का? वीणा हतबद्ध! वीणानं खरं कारण सांगितलं, पण तोवर विनीतच लग्न ठरलं होतं. अगदी योगायोगानं!  एका सेमिनारला विनीतला डॉक्टर प्रधानांनी सरळ आपल्या स्त्रीरोगतज्ञ असलेल्या मुलीशी ओळख करून देऊन लग्नाची मागणी घातली होती! एवढे सुप्रसिद्ध डॉक्टर, त्यांचं एक छोटसं हॉस्पिटल, मागे ते राहत होते. ‘प्रधान यांचे अस्थिरोग उपचार रुग्णालय’ फारच प्रसिद्ध. त्यांना पुढे मोठं हॉस्पिटल करायचं होतं.

****************************

वीणा आणि वसंतराव दोघंही मंत्रालयात नोकरी करत होते. दोघांच्याही कष्टाला फळं आली होती. गिरगावातल्या चाळीच्या जागी हा टॉवर उभा राहिला. आणि त्यांना हा चार भव्य खोल्यांचा उघड्या गॅलरीसहित अठराव्या मजल्यावर फ्लॅट मिळाला होता. दहा बाय दहाच्या तीन खोल्यात संसार झाला होता. त्यांच्यासाठी तर हा महालच होता. विनीतचं लग्न ठरलं, आजूबाजूला नवीन जन्माला आलेल्या कुटुंबाना धडपडताना, ठेचाळताना, ढासळताना  तिनं पाहिलं होतं. वीणाने ठरवलं, आपण असं होऊ द्यायचं नाही. दुसऱ्याच्या घरातून आणलेल्या कळीला उमलू द्यायचं, फुलू द्यायचं. फक्त कळीच राहिली तर तिचा गंध विरून जाईल. आपला तर संसार सुफळ संपूर्ण झाला आहे. सुनेचे सर्व लाड आपण पुरवू. वीणा आणि वसंतरावांनी त्या घराचं हौसेनं नूतनीकरण केलं होतं आणि नव्या गृहलक्ष्मीच्या आगमनासाठी घर सज्ज केलं होतं. चारही दिशांनी येणारा अवखळ वारा घराला ताजेपणा आणत होता, सकाळी खिडक्या दारातून सूर्यकिरणे जबरदस्तीने घरात घुसत होती, त्यांच्या प्रकाशाने घर रोज न्हाऊन निघत होतं, मुक्तपणे संचार करणाऱ्या कीटक मुंग्यांना थाराच नव्हता तिथं. उघड्या गॅलरीतून गुलाब, हिरवीगार तुळस, कुंडीतील दुर्वा, जास्वंद, वाऱ्याबरोबर कौतुकानं डुलत होती. आता सौख्य आणि आनंदाच्या लहरी ने हे घर भरून जाणार होतं. आता घराला खरं घरपण बहाल करण्यासाठी कुटुंबात नव्या सदस्याचं आगमन होणार होतं. घरात प्रवेश करताच समोर एक सुंदर पाटी

टांगून त्यावर लिहिलं होतं-

“घर असावे घरासारखे

नकोत नुसत्या भिंती,

प्रेम जिव्हाळा घेऊन यावे,

वसो निरंतर शांती”      

सुख सुख म्हणजे आणखी काय असतं? त्यांच्या आयुष्यात प्राजक्त फुलला होता, आणि यशाचा सडा पडत होता.

****************************

त्या प्रशस्त घराचा दर्शनी भाग म्हणजे हॉल जाहिरातीत शोभेल असा आकर्षक दिसत होता. इतर खोल्याही आपापली वैशिष्ट्ये राखून नव्या नवरीसारख्या नटून सजून बसलेल्या दिसत होत्या. फर्निचर च्या प्रत्येक कोपऱ्यात सुंदर मोहक अश्या मोठ्या फुलदाण्या ठेवलेल्या होत्या. त्यात हुबेहूब दिसणारी सूर्यफूल, गुलाब, निशीगंध वगैरे फुलांचे गुच्छ. हात लावला तरच कळत होतं की ती कागदी आहेत. खिडक्या बंद. प्रत्येक खोलीत एसी आहे ना! गच्चीवरच्या बागेतील कुंड्या खाली निर्वासित झाल्या होत्या. त्याजागी टांगता झुला, समोर वेताच्या दोन खुर्च्या. घरानं हळूहळू आपलेपणा सोडून परकेपणा स्वीकारला होता. आणि अशा कडक इस्त्रीच्या घरात दिवसभर नोकरांची वर्दळ. दूधवाल्याच्या सहाच्या बेलनं सगळं घर जागं होत होतं.  ती बेल म्हणजे घरातल्या त्या चार माणसांसाठी रेडी स्टेडी गो ची वॊर्निंग बेल असते. पेपरवाला, कचरावाली, भाजीवाली, पोळीवाली, इस्त्रीवाला, वॉचमेन, ड्रायव्हर, जेवण बनवणारी यांच्या ट्रिंग ट्रिंगने वीणा व वसंतराव हैराण होत. हॉस्पिटलचा व्याप वाढला होता. डॉ. प्रधानांच्या तळमजल्यावर आणखी दोन मजले चढले होते. विनीत आणि विनया दिवस-रात्र हॉस्पिटल मध्येच. कामाशिवाय बोलणंच नाही त्या घरात. इतक्या लहान वयात ह्यांना एवढा व्याप? स्वयंपाकघरात खोबरेल तेल, सनफ्लॉवर, शेंगदाणा तेल गायब झाले होते. ऑलिव्ह ऑइल, ऑरगॅनिक, उकडलेलं, तिखट आंबट नसलेलं, चपात्यांच्या जागी फुलके, चटणी कोशिंबिरी ऐवजी रायती सलाड फळं. घडाळ्याच्या काट्यावरचं आयुष्य. या सगळ्यात त्या दोघांचा जीव दिवसेंदिवस गुदमरू लागला होता. वीणाला वाटे मुलांनी कधीतरी मोकळ्या हवेत फिरायला जावं, डोंगरदऱ्यातून चालावं, निसर्गाचे निरनिराळे रंग डोळ्यात साठवावेत, धबधब्यांचे तुषार अंगावर झेलावेत,  दूरवर पसरलेल्या आकाशाच्या अंगणात तारे न्याहाळत ढगांची धावपळ पहावी, पावसाचं वाऱ्याचं संगीत कानात भरून घ्यावं, उन्हाची कोवळी किरणं अंगावर खेळवावीत आणि ताजंतवानं होऊन परत आपल्या कामाला लागावं. किंवा सुट्टीच्या दिवशी एकत्र जेवावं, गप्पा गोष्टी कराव्यात, हास्यविनोदात, टीव्ही पाहण्यात दिवस घालवावा. यांची निसर्गाशी जोडलेली नाळ तुटत चालली आहे का? निसर्गाने बहाल केलेली सहजता, सुंदरता यापासून ही मुलं फार दूर झालेली आहेत. पुढे पैसा, पाठी गरजा अशी रेस चालू आहे. घाण्याच्या बैलाप्रमाणे आपल्यासाठीच बनवलेल्या परिघात फिरताहेत! त्यांना कोण सांगणार? पैशाने सोयी विकत घेता येतात, संतोष आणि समाधान नाही. त्यांनी त्यांच्या जगण्याची दिशा पक्की करून ठेवली आहे. चौकट कधीच संपली आहे. वीणाला वाटतंय या सुंदर महालाची परीटघडी मोडणारं, अस्ताव्यस्त करणारं, दैनंदिन जीवनात घड्याळ आनंदाने बिघडवणारं, दुडुदुडु धावणारं असं बाळ घरात यावं. पण कुणाशी हे बोलावं? करिअर नावाच्या गाडीत मुलं बसली आहेत.  सुनेचा निर्विकार चेहरा, मुलाचा आपल्याच विश्वात गुरफटलेला चेहरा. जणूं काही आमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही डोकावू नये. तुमची देखभाल नीट चाललीय ना? असेच सूचित होत होते. वसंतराव कधी-कधी वीणाला समजावत असत ‘तुझ्या कल्पनेच्या चौकटीत ते मूल वाढणार नाही हे लक्षात ठेव’ वीणाच्या डोळ्यासमोर भूतकाळ उभा राहिला. लग्नानंतर दोघांनीही एकमेकांच्या साथीने एकमेकांना समजून घेऊन आनंदाने संसार केला होता. मुलाच्या शिक्षणासाठी निगुतीनं व्यय केला होता.  वसंतरावांना ना कोणी मित्र ना नातेवाईक. वीणानं नोकरी, घर याच्या व्यतिरिक्त इतर कशातही मन घातलं नव्हतं. त्यांचा संसार सरळ रेषेत झाला होता. त्यांच्या आयुष्यात ना कसली काळजी ना वादळ. म्हणता-म्हणता कष्टाच्या झाडाला सुखाची भरघोस फळं आली होती. खरंच काळ बदलेला होता का? की आपणच त्यांच्या बदलाला हातभार लावला होता? विनीत आणि विनया यांचा मधला काळ घरापासून दूर शिक्षणासाठी गेला होता. विनीत लहान असल्यापासून शेजारच्या काकूंकडे वाढला होता. त्याचे सगळे लाड काकूंनी केले होते. नंतर मोठा झाल्यावर तो शिक्षणासाठी बाहेर गेला. आता कुठं घरपण लाभेल, तर हे हॉस्पिटल! दिवसभराचा ताण घेऊन घरी आला तर घरातल्या वाढलेल्या तथाकथित गरजांनी अख्खं घरच गिळंकृत केलं होतं. कामाशिवाय बोलणं हसणं म्हणजे वेळेचा अपव्ययच जणू! घरात हे दोन रोबोट निर्माण झालेत का? फक्त आपलं कर्तव्य, इप्सित आणि त्या अनुषंगाने येणारी क्रियाशीलता. याशिवाय यांच्या कोषागारात काहीच नाही! प्रेम, दया, करुणा आनंद, सुख-दुःख या भावनांना दूर ठेवून फक्त आपलं कर्तव्य करीत राहणं. मुलगा म्हणून आपण त्याला सोडत नाही पण त्यानं आपल्याला कधी पकडलंच नव्हतं! 

****************************

पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशाची शोभा मनोहर करत होता. उघड्या गॅलरीत ती दोघं आरामखुर्चीत बसून मोकळ्या हवेचा श्वास घेत निवांत बसली होती. हवेतला गारवा आता हवाहवासा वाटत नव्हता. वसंतरावांनी पंच्याहत्तरी ओलांडली होती, वीणा सत्तरी. ती दोघं मूकपणे निर्विकार नजरेनं आकाशाकडे बघत बसली होती.  दोघांच्याही मनात असा विचार होता, आपल्यातला आधी कोण जाईल? जमिनीपासून इतक्या वर पर्यंत आलोच आहोत, आता त्यांना मृत्यूची भीती वाटत नव्हती. शेवटच्या प्रवासाला निघण्यासाठी दोघही आसुसलेली होती. सुख आपल्याला बोचतंय का, की त्यापासून आपण फार दूर गेलो आहोत? यालाच मोक्ष म्हणायचा का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *