संग्राम

भारत-पाक युद्धाचे सीमेवर पडघम वाजू लागले आहेत.  युद्ध कोणाच्याही हिताचे असू शकत नाही हे नक्की पण त्या शक्यतेमुळे सावधानता, सतर्कता, निरीक्षण, सुरक्षा यांची जाण प्रत्येक नागरिका मध्ये येते.  तसं माणसाला जीवन जगताना या सर्व गोष्टींची आवश्यकता असतेच.  रात्रंदिन आम्हाला युद्धाच्या प्रसंगाला सामोरं जावं लागतंच ना?  जन्माला येतानाच त्याचे पडघम मातेच्या उदरात वाजायला सुरुवात होते.  नवीन जीव जन्माला म्हणजेच  या मृत्यूभूमीत यायला धडपड करत असतो.  जे शरीर मिळतं ते आपापल्या प्रारब्धानुसार  माता-पित्यांच्या पदरात पडते. गरिबीत जन्म झाला तर सुरुवातीपासून जगण्यासाठी लढण्याचा सराव सुरु होतो.  अनाथ अपंग जीव असेल तर या जगात तह करून राहण्यासाठी इतरांशी, परिस्थितीशी जमवून घ्यावे लागतेच.  खात्यापित्या घरी किंवा सधन कुटुंब मिळालं तर सुजाण होईपर्यंत लाडाकोडात तो जीव न्हाऊन निघतो खरा पण पुढचं आयुष्य ते सर्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतोच. 

ज्यांचं भविष्य खडतर असतं त्यांना आयुष्यभर परिस्थितीशी दोन हात करावेच लागतात.  या भवसागरात अनेकदा नाका तोंडात पाणी जाण्याची शक्यता असते.  मान-अपमान, राग-द्वेष, सुख-दुःख, यश-अपयश या लाटांच्या माऱ्यापासून गटांगळ्या खात किनारा गाठण्यासाठी माणूस सतत धडपडत असतो.   शरणागती, अगतिकता, तडजोड, अपयश यांच्याशी तह धरूनच पुढचा प्रवास चालू ठेवावा लागतो. 

देशासाठी लढणारे वीर आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी म्हणून सदैव तळहातावर शीर ठेवून सज्ज असतात तर इथे आपण सर्व नागरिक भवतिक रणांगणावर आपले म्हणून गृहीत धरलेल्या माणसांसाठी, कुटुंबासाठी आयुष्यभर लढत असतो.  महाभारताच्या युद्धात आपली माणसं सगे-सोयरे नातलग पाहताच अर्जुनाचं लढण्याचं बळ गळून पडलं होतं.  त्याला समजावयाला त्याचा सख्खा मित्र प्रत्यक्ष कृष्ण भगवान होता.  तर इथं आपल्या संसारात ज्यांच्या साठी आयुष्य पणाला लावलं ती हीच का आपली माणसं? असा प्रश्न पडतो.  पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. ज्यांच्यासाठी सुरक्षाकवच बनवत आयुष्य वेचतो त्यातून ती कधीच बाहेर गेलेली असतात.  आणि ते कळेपर्यंत आपली या भूमीवरची मुदत संपत चालली आहे याची जाणीव होते.  मग या घायाळ झालेल्या जीवाचे स्वतःशीच युद्ध सुरु होते. थकलेल्या शरीरातून बाहेर न जाण्यासाठी त्याची चळवळ सुरु होते.  तोवर दबा धरून बसलेले रोगरूपी शत्रू आधीच कमजोर झालेल्या शरीरावर चाल करून येतात.  इथं आता शेवटची लढाई जीवाची शरीराशी सुरु होते. त्यात शरीरच हरतं आणि जीव आपली सुटका करून बाहेर पडतो शिवाच्या दिशेने!

महायुद्धात अर्जुनाला सुरुवातीलाच त्याचा मित्र-सखा श्रीकृष्ण म्हणजे अप्रत्यक्ष भगवान भेटला होता.  आपण माणसं मात्र मीच एक तो शहाणा या न्यायानं मार्गदर्शकाची जागा रिकामी ठेवतो आणि शेवटची लढाई अर्थातच हरतो.  ज्याला मार्गदर्शक किंवा वाटाड्या भेटतो त्याचा हा जन्म सुफल संपन्न नक्कीच होतो. 

निसर्गात देखील हे जगण्याचे युद्ध अहोरात्र चालूच असतं. अंधाराचा प्रकाशाशी, पाण्याचा अग्नीशी, पृथ्वीचा आकाशाशी, वाऱ्याचा स्थिरतेशी, चलाचा अचलाशी संघर्ष चालूच असतो.       त्यात जो बलवान तो जिंकतो ही पंचमहाभूतांची मोट एकत्र बांधून तो विधाता त्यात आपलाच अंश असलेल्या जीवात्म्याला घालून ती ‘पोटली’ मृत्युलोकात जन्म देतो.  आणि ही सगळी एकमेकांविरुद्ध असलेली तत्व या शरीरात मात्र हातात हात घालून राहतात, हे नवलच नाही का?   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *