क्वारंटाईन

अनंतरावांनी हातातली गच्च भरलेली पिशवी त्या पारावर ठेवली आणि दोन मिनिटं विश्रांती घेतली, दोन्ही हातात हात मोजे, तोंडावर मुख्पट्टी, डोक्यावर टोपी. नेहमी झपझप चालणाऱ्या अनंतरावांची चाल आज मंदावली होती. घरात बायको भाजीसाठी वाट पाहत असेल, पण असं एकदम गळल्यासारखं का वाटतंय बरं, घशाला कोरड पडेल असं वाटतंय, कफाने तर घशात ठाण मांडून कित्येक महिने झाले.  गेले दोन दिवस ते अस्वस्थच आहेत.  समोरचे घाडगे काका, वय वर्ष ७५, तापाचं निमित्त झालं आणि मुलानं कोरोना रुग्णालयात भरती केलं. पाचव्या दिवशी त्यांच्या फक्त मृत्यूची बातमी घरच्यांना कळली होती. तरी बरं झालं बायको आधीच गतवर्षी गेली, आता रडायला पाठी कुणी नाही! मुलगा आणि त्याचं कुटुंब. जागा खाली झाली म्हणायची!  त्यांनी आपले विचार झटकण्याचा प्रयत्न केला. आपल्याला काही होणार नाही. आपली तब्बेत ठणठणीत आहे. रोज बाहेरून आल्यावर अंघोळ, वाफ घेणे, सानिटीझरचा वापर, आर्सेनिक ३० चा डोस, लिंबूपाणी, इडल्या-डोसे, त्या यु-ट्यूब वरचे सगळे उपाय आपण करतोच. खाणं-पिणं मजबूत, पचनशक्ती चांगली, ना मधुमेह ना रक्तदाब! आपल्याशीच विचार करत त्यांनी पिशवी उचलली नि घरच्या दिशेनं निघाले. हे नकारात्मक विचारच माणसाला अर्धमेले करतात. पण समजा आपल्याला बाधा झाली तर अंजली काय करेल? मला क्वारंटाईन केलेच तर आपल्याच घरी करावं असं मी म्हणतोय. पण अंजु ला काही झालं तर? तिला तर इस्पितळातच ठेवावं लागेल! या विचाराने त्यांना दरदरून घाम आला. हातपाय लटपटू लागले! नाही नाही असं काही होणार नाही. तिला तर आपण घरच्या बाहेरच पाठवत नाही. तिला काही हणार नाही. अरे पण त्या अमिताभ बच्चन ला त्याच्या कुटुंबाला कसा झाला बरं? हे मोठे लोक किती काळजी घेत असतील! अनंतरावांनी एकदाचं घर गाठलं.  “काय हो? एवढा उशीर तुम्हाला होत नाही! द्या बरं ती भाजी धुवून मग तुम्ही जा अंघोळीला.” 

दोघेही जेवायला बसले. अनंतरावांच्या मनात घालमेल चाललेली होती. अंजलीताईंनी जेवताना विचारलं “काय हो, कुणी रस्त्यात भेटलं होतं का?” “थोडं अस्वस्थ वाटतंय” त्यांनी पटकन म्हटलं. “अगं आपण दोघच राहतो, आपल्याला विलगीकरणात जायची वेळ आली तर? वर दोघांना एकदाच अशी वेळ येईल का? किंवा एक घरात एक बाहेर! मग कसं होईल? सकाळ पासून नको नको म्हणताना हे अभद्र विचार जाता जात नाहीयेत”. त्यावर अगदी सहजपणे अंजलीताईंनी त्यांना समजावलं. “हे पहा वर्षानुवर्ष कुलूप बंद असलेल्या खोलीत काय काय असावं असा विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. नियती ही अशा बंद खोली सारखी असते. कल्पनेला पंख असतात. ती कितीही आणि कुठेही उडू शकते. तेव्हा ‘जर’ आणि ‘तर’ हे शब्द                                            कलाईडोस्कोपच्या तुटलेल्या बांगडीच्या काचा प्रत्येक फेरीत जो विशिष्ट आकार तयार करतात, तो आकार त्या काचांची किमया असते, आपली नाही. तेव्हा आता सक्षम आहोत, काळजी घेत आहोत, आला दिवस सुखाचा. जेवा आणि तुमची आवडती जुनी गाणी ऐकत एक डुलकी काढा.” आपली बायको काळजी करत नाही हे ऐकून त्यांना अर्ध ओझं उतरल्यासारखं वाटलं. खरंच आपण का बरं घाबरलो! घाडगे काका गेले.. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं मृत्यूला कारण तर लागतंच. आपल्या ७० वर्षांच्या आयुष्यात अनेक मृत्यू पहावे लागलेत कुणी अचानक गेला तर कुणी आजाराने. त्यांना कुठे मृत्यू ने विचारलं होतं!

विलगीकरणाची भीती बाळगण्याचं कारण नाही. तसं पाहिलं तर आयुष्यात मागे वळून पाहताना असे प्रसंग अनेक वेळा येऊन गेलेत. मुळातच जन्मतःच नऊ महिने नऊ दिवस आईच्या गर्भातून आपोआप विलगीकरण झालं ना! पुढे आईचा पदर सोडून शिक्षणासाठी त्या दोघांपासून दूर जावं लागलं, तेव्हाचं ते दुःख कधी संपून गेलं आणि आपण आई-वडिलांना कायमचे दुरावलो ना? पुढं अंजलीच्या येण्यानं जीवन आनंदी सुफळ संपूर्ण झालं. इतकी वर्ष कधी गेली कळलं सुद्धा नाही. तीच अंजली आपलं माहेर सोडून आपल्यात आली, ती परत मागे वळून सुद्धा पाहण्याची तिला आपण उसंत दिली नाही.  पोटच्या मुलीला आपल्यापासून विलग करताना विरहा पेक्षा आनंदच जास्त झाला होता. त्यांना आपले कचेरीतले दिवस आठवले. एवढी वर्ष ज्या कंपनीने आपल्याला थारा दिला, जिच्या जीवावर आपण हे समृद्ध जीवन जगलो, ती कंपनी आज आपल्यापासून विलग झाली होती. निरोप समारंभ म्हणजे तो परतीचा प्रवास बंद झाला होता. त्या विलगीकरनं आपण कितीतरी दिवस सैरभैर झालो होतो. आणि दहा वर्षांपूर्वी एकुलत्या एका मुलानं अलगदपणे आपल्याला इथे ठेवून स्वतः नवीन जागेत बदलीच्या नावानं पुण्याला घर संसार थाटला होता! सून मुक्काम-पोस्ट पुणे, शेजारी आई-वडील! त्यालाही आपण सामोरे गेलोच ना! अंजू म्हणते तसंच बंद खोलीत डोकावण्याचा प्रयत्न करायचा नाही. शेवटी देहापासून प्राण विलगीकरण कधी ना कधी होणारच आहे, मग कशाला नको त्या काळजीत डोकं घालायचं? गणपतीच्या आगमनाची तयारी करायची, हळदीची पानं घालून उकडीचे मोदक! वा वा! बाप्पा ज्याच्या त्याच्या घरी आणि मोदकाचं मात्र पोटात विलगीकरण!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *