डोंगर म्हातारा झाला
कोणे एके काळी हा जिवतीचा डोंगर बाराही महिने हिरवागार गच्च राई नं भरलेला होता . वडा – पिंपळाची झाडं रानपाखरे अंगाखांदयावर खेळवीत ताठ उभी होती. आंबा काजू ,फणस ,उंबर ,खैर साग माड छोट्या मोठ्या जनावरांना आसरा देत होती . बोरी करवंद यांच्या झुडपांनी उंदीर घुशी मुंगूस साप यांच्या लपंडावानी तिथं जिवंतप णा जाणवत होता .
या सर्वांच्या दिमतीला खळखळ वाहणारे झरे बाराही महिने संगीत देत होते .डोंगराच्या पायथ्याशी या डोंगराचे मालक घारू अण्णा राहत होते . त्यांनी आपल्या कर्तबगारीने इथं आलिशान वाडा बांधला होता . समोरच्या मोठ्या जागेत नारळी,पोफळी , केळी पेरू , लिंबं यांचं शिवार होतं ..पुढच्या सपाटीला भाजीपाला मिरच्या वगैरे सारखी बारमाही पिकं निघत होती ..परस दारात तुडुंब भरलेली विहीर अण्णांची खरी लक्षुमी होती. तिने अण्णांच्या घरी भरभराट आणली होती . मुलाबाळानी घराचं गोकुळ झालं होतं . अण्णांची हयात इथं गेली होती त्यांचा हात ढिला होता . अडल्या नडल्याला मदत करण्याची त्यांची सवय माणसं जोडून होते . गावातल्या पोरीबाळींची लग्नकार्य झाली कि अण्णांच्या पायावर डोई ठेवण्याची परंपरा झाली होती .मग साडी चोळीची ओटी भरून त्याच्या संसाराची सुरवात होत होती . दूध दुभत्याची कमी नव्हती.
हाहा म्हणता काळ आपल्या पायानी पुढं सरकत होता अण्णांची सहाही मुलं शिकून सवरून आपापल्या संसाराला लागली. तिन्ही लेकी समृद्ध च्या सासुरवाशिणी झाल्या तर तीन सुना अण्णांच्या घरात लक्षुमीच्या पावलांनी आल्या . सगळं कसं सुरळीत चाललं असतांना अण्णांच्या सोबतीणीने साथ सोडली , तिच्या मृत्यूने अण्णांची पुढची दहा वर्ष मागे आली .. अचानक आपलीच सावली आपल्याला सोडून गेली अशा विचारानं त्यांना रितेपण आलं ,आणि हळूहळू सगळ्या कारभारातून त्यांनी मन काढून घेतलं. पोरांनी कारभार हाती घेतला . सुनंच राज्य सुरु झालं ,
नारळी पोफळींनी सजलेल्या पडव्या रिकाम्या झाल्या . लाल मिरच्यांचे लालहिरवे गालिचे गायब झाले . आता हे सर्व परस्पर बाजारात जाऊ लागले ट्रॅक्टर आले ,शेतीची अवजारं आली नि गोठ्यातले बैल नाहीसे झाले निसर्गाची ही दौलत आतल्या आत गायब होऊ लागली . अण्णा जाग्यावर बसले , शरीराने असहकार पुकारला उघड्या डोळ्यांनी वर्तमान बघायची शिक्षा वाटू लागली .
बघता बघता दिवस वाऱ्याच्या वेगाने पालटले ,वाड्याच्या पाठचा मांगर ,अडगळ काढून साफसूफ करून त रूप दिलं गेलं ,तिथं खाट,ताट तांब्या आणि इतर उक्त असं घर तयार केलं गेलं आणि त्या लोखण्डाच्या पलंगावर अण्णांचं धूड विसावलं होत सकाळ संध्याकाळ डॉक्टर आणि कामवाली शिवाय कुणी फिरकेनास झालं ,आता वाड्यात थोर मोठ्यांची ,राजकारणी माणसांची वर्दळ वाढली ,धुरळा उडवीत चार चाकी गाड्या दारापुढं उभ्या राहू लागल्या . दिवसाची खलबतं ,नी रात्रीच्या पार्ट्या झडू लागल्या . जिवतीच्या डोंगरावरून रस्ता झाला . गाड्यांच्या आवाजानं जन जनावर पळून गेली . पाण्याचा झरा आटून गेला नी धुळीच्या अंघोळीनं झाडामाडांनी गाशा गुंडाळायला सुरवात केली . सागाच्या झाडांना कुऱ्हाडीचे घाव बसू लागले तर खैराच्या झाडांना कातकरी चिकटले ,डोंगरावरच्या निसर्गानं पलायन केलं आणि डोंगर रिकामा झाला जमिनीचे भाव वाढले रस्ता झाला तशी वस्ती वाढू लागली . मातीच्या भरावासाठी जागोजागी खड्डे पडले डोंगराच्या दुसऱ्या कुशीत कातळ लागला ,तिथं मोठमोठ्या मशिनींनी चिऱ्यांना जन्म दिला आता तर डोंगर दात पडलेल्या म्हाताऱ्यासारखा भकास दिसू लागला आता पैशाचा पाऊस पडत होता .विनासायास मिळकतीमुळे कष्ट संपले ,दारात गाड्या उभ्या राहिल्या . जुनी माणसं जाग्यावर बसली ,त्यांच्या पोराबाळांनी
शहरांचा रस्ता धरला आता डोंगर दात पडलेल्या म्हाताऱ्यासारखा दिसू लागला . आणि घारू अण्णा भूतकाळाशी हितगुज करत अजून तग धरून जगत होते.
